उरुळी कांचन, (पुणे) : शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत राहत्या घराच्या आडोशाला गावठी दारू विक्री करणाऱ्याला उरुळी कांचन पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी कच्चे रसायन व तयार दारू असा ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लाला उर्फ कांतीलाल जवाहर राठोड (वय ३४, रा. काळे शिवार वस्ती, शिंदवणे, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अमोल संजय खांडेकर यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (ता. २९) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
उरुळी कांचनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत लाला उर्फ कांतीलाल राठोड हा राहत्या घरात मानवी जिवनासाठी विशारी गावठी हातभटटीची दारू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला.
यावेळी त्या ठिकाणी गावठी दारू बनवण्याचे साहित्य व कच्चे रसायन, प्लास्टिकची कॅन्ड, गावठी हातभट्टीची तयार दारू, जवळच्या एका पडक्या घरामध्ये निळया, काळया व पिवळया रंगाचे प्लॅस्टिकचे कॅन्डमध्ये तब्बल ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. संबंधित मुद्देमाल सापडल्याने राठोड याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, उरुळी कांचनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी मागील दोन महिन्यांपासून गावठी हातभट्टी दारू व जुगार यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मागील दोन महिन्यांपासून पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या वेगवेगळ्या कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्या आरोपींचे धाबे दणाणले आहेत. तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे करीत आहेत.
सदरची कामगिरी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पडुळे, सहाय्यक फौजदार उमेश जगताप, पोलीस हवालदार रमेश भोसले, सचिन जगताप, शशिकांत खाडे, होळकर, पोलीस शिपाई अमोल खांडेकर, अक्षय कामटे, अमोल राऊत तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार नागरगोजे, घाडगे, भुजबळ यांनी केली आहे.