उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत राहत्या घराच्या आडोशाला ओळखीच्या नागरिकांना गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेवर गुन्हा दाखल करत उरुळी कांचन पोलिसांनी तिला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५४ हजार ८०० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील जय मल्हार रोड, वडार वस्ती येथे गुरुवारी (ता. २८) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही करवाई करण्यात आली आहे.
पारुबाई महादेव जाधव (वय ५६ रा. जय मल्हार रोड, वडार वस्ती ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार रमेश सोमनाथ भोसले यांनी फिर्याद दिली आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन शहरात अमली पदार्थ विक्री होत असल्याची माहिती उरुळी कांचन पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी मिळालेल्या माहितीच्या आधारे वरील ठिकाणी सापळा रचला होता.
सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता आरोपी महिला पारूबाई जाधव ही ओळखीच्या नागरिकांना घराच्या आडोशास गांजा विक्री करीत असल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी पाहणी केली असता एका पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये ३ किलो १६६ किलोग्रम उग्र वासाचा गांजा आणि ६०० रुपये रोख रक्कम, असा एकूण ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील करीत आहेत.