बारामती : आंब्याच्या झाडाला, शेवग्याच्या शेंगा… हे गाणे सुपरिचीत आहे. त्याचप्रमाणे ‘टोमॅटोच्या झाडाला, आले पोटॅटो…’ असे कोणी सांगितले, तर आश्चर्य वाटेल ना? हो, हे सत्य आहे. ही तंत्रज्ञानाची कमाल आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्रात आधुनिक शेती तंत्रज्ञानाने एकाच वेळी एका झाडावर बटाटे आणि टोमॅटो घेता येणार आहेत. टोमॅटोच्या झाडाला वरती टोमॅटो आणि खाली बटाटे, असा प्रयोग आहे. त्याचा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
नवीन तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती करुन देण्यासाठी बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन सुरु आहे. या कृषी प्रदर्शनास राज्यभरातील शेतकऱ्यांची गर्दी झाली आहे. कृषी प्रदर्शनात टोमॅटोच्या झाडाला बटाटे लावण्यात आले आहेत. “पोमॅटो” ही नवीन संकल्पना कृषी विज्ञान केंद्रात राबवून यशस्वी पीक घेण्यात आले आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्रात आधुनिक शेती तंत्रज्ञानाने हे टोमॅटोचे पीक विकसित करण्यात आले आहे. त्याचा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
देशात पहिल्यांदाच नवीन संकल्पना राबवण्यात आली आहे. शारदानगरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संकल्पना राबवण्यात आली आहे. “पोमॅटो” म्हणजे पोट्याटो आणि टोमॅटो एकत्र आणले आहेत. टोमॅटोच्या झाडाला कलम करून बटाट्याचे पीक घेण्यात आले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. या पिकाचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहता येत आहे. बारामतीमधील कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना हा प्रयोग पाहण्यासाठी गर्दी केली होती.
बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनामध्ये परदेशी कोथिंबीरचे यशस्वी पीक घेतले आहे. ही परदेशी कोथिंबीर पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. या कोथिंबीरीचे नाव कर्ली पार्सली असे आहे.