पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. समजावून सांगण्यासाठी गेलेल्या जावयावर सासरच्या मंडळींनी धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंढवा परिसरात सोमवारी 16 जून रोजी घडली. या घटनेत जावई गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी विशाल सिद्राम गायकवाड (वय-34 रा. म्हसोबा नगर, केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मेहुणा संतोष जाधव (वय-26 रा. पवार वस्ती, केशवनगर, मुंढवा), साडु दत्ता गायकवाड, मेव्हण्याचा मुलगा समर्थ गुडरेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी संतोष जाधव हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल गायकवाड यांची मुंढवा परिसरातील पवार वस्ती येथे सासुरवाडी आहे. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते सासुरवाडीतील लोकांना समजावून सांगण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी आपआपसात संगनमत करुन फिर्यादी यांच्या सोबत वाद घालण्यास सुरुवात केली.
त्यानंतर आरोपींनी विशाल यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हातातील लोखंडी धारदार शस्त्राने व लोखंडी पाईपने छातीवर, मानेवर वार करुन गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहेत.
तर अंजु यमनुर जाधव (वय-53 रा. केशवनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विशाल सिद्राम गायकवाड (वय-34 रा. म्हसोबा वस्ती, केशवनगर) याच्यावर आयपीसी 324, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फिर्यादी यांच्या घरासमोर आला.
त्याने तुम्ही माझी तक्रार का करता असे बोलून फिर्यादी व त्यांचा मुलगा संतोष याला शिवीगाळ केली. तसेत धमकी देऊन संतोष याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी भांडण सोडवण्यासाठी आल्यानंतर आरोपीने त्यांच्यावर धारदार हत्याराने वार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मुंढवा पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.