दहिटणे (पुणे): दौंड तालुक्यातील दहिटणे येथील बापूजी बुवा वस्ती परिसरात आपल्या मेंढ्या चारण्यासाठी आलेला मेंढपाळ धुळाजी बाळू भिसे यांचा दहा महिन्याचा मुलगा अवनीत भिसे याला बिबट्याने बुधवार दि. 30 रोजी सकाळी झोपेत असताना पळविले व नजीकच असलेल्या उसाच्या शेतामध्ये घेऊन गेला होता. त्यानंतर काही वेळातच वनविभागाकडून तपासणी सुरू केली होती यामध्ये वनविभागाची रेस्क्यू टीम,श्वान पथक, पोलिस,ड्रोन याच्या सहाय्याने मागील 30 तासापासून या लहान बाळाचा शोध सुरू होता. हा परिसर पूर्णपणे उसाच्या शेतीचा असल्याकारणाने शोधण्यास अनेक अडथळे येत होते. अखेर 30 तासानंतर गुरुवार दि.1रोजी दुपारी 12वा. या बाळाचा मृतदेह शोधण्यात वन विभागाला यश आले असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.
या शोधकार्यामध्ये वनविभागाकडून दीपक पवार सहाय्यक वनरक्षक,राहुल काळे वनपरिक्षेत्र अधिकारी,अजित परांजपे अंकुश खरात, गणेश मस्के, वीरेंद्र लंकेश्वर, शिवकुमार बोंबले,अक्षय शितोळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
आईचा हंबरडा पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले
बुधवार दि. 30 रोजी अक्षयतृतीयेचा मुहूर्त असल्याकारणाने आईची नैवेद्याची तयारी चालू असतानाच आपल्या पोटच्या बाळाला बिबट्याने नेताना या मातेने पहिल्यापासून या मातेची झालेली कासावीस अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी होती. आणि या बाळाचा मृतदेह पाहताच आई वडिलांसह नातेवाईकांनी हंबरडा फोडला.आणि घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचे डोळे पाणावले.
पोराला नेण्यापेक्षा चार पाच बकरी नेली असती तरी बरं झालं असतं असा नातेवाईकांचा संवाद काळजाला भिडणारा असल्याकारणाने प्रत्येक नागरिकांनी घटनेची हळहळ व्यक्त केली.