पुणे : पुण्यातील नाना पेठ परिसरात गेल्या चार दशकापासून आपली दहशत निर्माण करणार्या आंदेकर टोळीचा इतिहास हा रक्तरंजितच आहे. तुम्ही दुसर्याचा जीव घेतला तर तुमचाही कोणीतरी जीव घेतल्याशिवाय गप बसणार नाही, असे म्हटले जाते. मात्र, वनराज आंदेकर याच्या हत्येने हे सिद्ध झालं असल्याचं पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर आंदेकर टोळीचं नाव सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे 25 वर्ष पुण्यातील मध्यवर्ती भागात दहशत पसरवणाऱ्या या आंदेकर कुटुंबाचा इतिहास असाच रक्तरंजित आहे.
पुण्यात पूर्वी अनेक छोट्या मोठ्या टोळ्या सक्रिय होत्या. यामध्ये बाळकृष्ण ऊर्फ बाळु आंदेकर याची टोळी होती. मटका, जुगार, गावठी दारुची विक्री करुन त्यातून पैसा कमावणे हा या टोळ्यांचे उद्योग असायचे. या टोळ्या एकमेकांवर हल्ला करण्यासाठी सायकलची चैन, तलवारी, रामपूरी चाकू, सोडा वॉटरच्या बाटल्या यांचा वापर करत असे.
बाळू आंदेकर याचा 17 जुलै 1984 रोजी खून
आंदेकर आणि माळवदकर यांची सुरुवातीला एकच टोळी होती. मात्र छोट्या मोठ्या वादातून प्रमोद माळवदकर आणि आंदेकर हे वेगळे झाले. 1980 च्या दशकापासून बाळु आंदेकर आणि प्रमोद माळवदकर या दोन टोळ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु झाली होती. आंदेकर टोळीने प्रमोद माळवदकर याच्या वडिलांचा निर्घृण खून केला. त्याच खुनाचा बदला घेण्यासाठी माळवदकर टोळीने शिवाजीनगर येथील कोर्ट परिसरात बाळू आंदेकर याचा 17 जुलै 1984 रोजी खून केला. त्यानंतर या दोन टोळ्यांमधील गँगवॉर आणखीच वाढले. या गँगवॉरमध्ये 6 गुंड मारले गेले. जवळपास दहा वर्ष हे गँगवॉर अधूनमधून डोके वर काढत होते.
गुन्हे शाखेच्या पथकाकडून प्रमोद माळवदकर याचा इन्काऊंटर
दरम्यान, पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या पथकाने काळेवाडी येथे 19 नोव्हेबर 1997 रोजी पहाटेच्या सुमारास प्रमोद माळवदकर याचा इन्काऊंटर केला. या चकमकीत तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक याच्या दंडाला गोळी चाटून गेली होती. या घटनेत ते जखमी देखील झाले होते. प्रमोद माळवदकर याच्या मृत्युनंतर माळवदकर टोळी जवळपास नामशेष झाली. त्यानंतर माळवदकर-आंदेकर टोळीयुद्ध जवळपास थांबले होते. मात्र, आंदेकर टोळी वेगाने आपलं वर्चस्व वाढवत होती. बाळू आंदेकर याच्यानंतर सूर्यकांत ऊर्फ बंडु आंदेकर याच्या हातात आंदेकर टोळीची सुत्रे आली.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीद्वारे राजकारणात एंट्री
त्यानंतर काही काळ गुन्हेगारी विश्वातच आंदेकर टोळी आपले वर्चस्व राखून होती. 1997 मध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुका लागल्या. यावेळी आंदेकर टोळीने थेट राजकारणात प्रवेश केला. या टोळीशी संबंधित चार जण महापालिकेत निवडून आले होते. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजेच 1998-99 मध्ये वत्सला आंदेकर यांची शहराच्या महापौरपदी निवड करण्यात आली होती. वत्सला आंदेकर या अक्का म्हणून ओळखल्या जात असायच्या. त्यानंतर आंदेकर टोळीने गुन्हेगारी क्षेत्रातील आपल्या निकटवर्तीयांशी संबंध कमी करण्यास सुरुवात केली.
बंडु आंदेकर याला जन्मठेपेची शिक्षा
त्यानंतर देखील आंदेकर बंधुंचे वर्चस्व वाढतच होते. कोणी विरोध केला तर त्याला मारण्यासाठी गुंड पाठविणे, त्यासाठी सुपारी देणे असे प्रकार आंदेकर टोळीकडून होत होते. अशा गुन्ह्यातच फरासखाना पोलीस ठाण्यातील एका खून प्रकरणात सूर्यकांत ऊर्फ बंडु आंदेकर याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. काही काळानंतर आंदेकर टोळीचा वरचष्मा कमी होऊ लागला होता. बंडु आंदेकर आत असताना त्याचा मुलगा वनराज आणि कृष्णा हे दोघे टोळी चालवू लागले. त्यानंतरच मग वनराज आणि कृष्णा आंदेकर यांच्यावर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली. आंदेकर टोळीवर नियंत्रण आणण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न राहिला. त्यातूनच वनराज आणि कृष्णा या दोन भावांना 2009 मध्ये एकाचवेळी तडीपार केले होते.
आंदेकर टोळीचे वर्चस्व पुन्हा वाढले
बंडु आंदेकर हा जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर आंदेकर टोळीचे वर्चस्व पुन्हा वाढू लागले. त्याचवेळी इतर टोळ्याही आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे या टोळ्यांचा आंदेकर टोळीशी संघर्ष सुरु झाला. यातून खून, खूनाचा प्रयत्न, हाणामारी, खंडणी वसुली, असे गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली. त्यातून बंडु आंदेकर याच्यावर किमान तीन वेळा मोक्का कारवाई करण्यात आली.
आंदेकर टोळीने नव्याने आलेल्या अनेक टोळ्यांशी संघर्ष केला आहे. यामध्ये अतुल कुडले, सुरज ठोंबरे या नव्या टोळ्यांचा समावेश आहे. आंदेकर टोळीने अनेकांना संपविले किंवा संपविण्याचा प्रयत्नही केला. मात्र, वनराज आंदेकर याचा खून हा त्यांच्या कौटुंबिक वादातून झाला आहे. इतर टोळ्यांबरोबर लढता लढता आंदेकर कुटुंबाला कुटुंबातील व्यक्तीशी संघर्ष करावा लागला?