लोणी काळभोर : सध्याचा काळ कौशल्य विकासाचा असून, अशा काळात विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी स्पर्धेमध्ये सहभागी होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या आधुनिक युगात विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर त्यांच्या सप्त गुणांना वाव मिळाला पाहिजे, असे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थ सहसचिव तथा प्राचार्य सीताराम गवळी यांनी सांगितले.
श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचा समारोप कार्यक्रम शुक्रवारी (ता.१९) झाला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सीताराम गवळी बोलत होते. यावेळी समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे प्राचार्य ए. के. मंजुळकर, इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या पौर्णिमा शेवाळे, कन्या प्रशालेच्या प्राचार्या एन. एम. झिंजूरके, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धांच्या माध्यमातूनच चिमुकल्यांच्या कलागुणांना मिळते प्रोत्साहन
यावेळी बोलताना प्राचार्या पौर्णिमा शेवाळे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना जशी वाट मोकळी करून दिली जाते, त्या वाटेने त्यांची बुद्धी चालायला लागते. या स्पर्धांच्याच माध्यमातूनच चिमुकल्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी साकारलेल्या एकापेक्षा एक अप्रतिम अशा कलाकृती बघून मनस्वी समाधान आणि आनंद मिळाला. यावेळी शाळेतील मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला.
विविध स्पर्धांचे आयोजन
स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहात वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला , निबंध, क्रीडा, हस्ताक्षर कला व विज्ञान प्रदर्शन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ५ वी ते १० वी च्या काही विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. तसेच ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा भरविला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वत: बनवलेल्या वस्तू, भाजीपाला, नाष्टा, स्टेशनरी, गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल लावले होते. मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावे, असा यामागील उद्देश होता.
दरम्यान, लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर, उपसरपंच प्रियंका काळभोर यांनी श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाला भेटी दिल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.