बारामती : बारामती तालुक्यातील ऊस दरात अग्रेसर असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने सभासदांनी कारखान्याकडे नोंदवलेला ऊस बाहेरच्या कारखान्याला घालणाऱ्या सभासदाच्या सर्व सवलती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या सर्व कार्यक्षेत्रातील सभासदांतून संचालक मंडळाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सभासद शेतकऱ्यांनी बाहेरील कारखान्यास ऊस घालू नये. अनेक सभासदांना ऊस बाहेर घालण्यास बळी पाड्ले जात आहे. अशा तात्पुरत्या प्रलोभनाला बळी न पडता स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेऊ नये. कारखान्याकडे नोंदवलेला ऊस बाहेरील कारखान्याला देऊन कारखान्याबरोबर केलेला ऊस नोंद कराराचा भंग करण्याची चूक करू नये, असे आवाहन सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी केले आहे. त्यामुळे निंबुत, खंडोबाचीवाडी, गरदडवाडी, वानेवाडी, मुरूम व सर्वच गटातून सभासदांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कारखान्याचे संचालक मंडळ फक्त पाच वर्षांसाठी संस्थेवर विश्वस्त म्हणून असते. सहकारात खरा मालक हा त्या कारखान्याचा सभासदच असतो. सभासदांच्या सर्व सवलती बंद करू म्हणणाऱ्या संचालक मंडळाबाबत सभासदांनी नाराजी व्यक्त केली. इतर कारखान्याला ऊस का द्यावा लागतो, याचेसुद्धा आत्मपरीक्षण संचालक मंडळाने करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा सभासदांनी व्यक्त केली. लवकरच सभासदांचे एक शिष्टमंडळ या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार असल्याचे सभासदांतून बोलले जात आहे