उरुळी कांचन, (पुणे) : येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीची विद्यार्थीनी श्रेयसी सागर थोरात हिने अस्मिता वेस्ट झोन खेलो इंडिया स्पर्धेत कास्यपदक पटकावले आहे. 51 किलो वजनी गटात थोरात हिने हि कामगिरी केली आहे.
गोवा येथे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया व इंडियन पिंचाक सिलाट फेडरेशन यांच्या पिंचाक सिलाट असोसीएशन ऑफ गोवा ने आयोजित केलेल्या पेडेम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हापसा, गोवा येथे 21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान अस्मिता वेस्ट झोन खेलो इंडिया वुमेन्स पिंचाक सिलाट लीग क्रीडा स्पर्धा पार पडल्या.
यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दीव दमण, आणि यजमान गोवा अशा सहा राज्यातील तीनशे महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये महाराष्ट्र संघातील 81 महिला खेळाडूंची निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंची सुवर्ण कामगिरी करत 26 सुवर्णपदकसह चॅम्पियनशिप चषक पटकावला.
महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करत एकूण 26 सुवर्ण 18 रत्न ,12 कास्यपदके म्हणून 56 पदकांची कमाई करत खेलो इंडिया वुमन लीग मध्ये महाराष्ट्र संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत स्वामी विवेकानंद अकॅडमीची कुमारी श्रेयसी थोरात हिने 51 किलो वजनी गटामध्ये कास्यपदक प्राप्त केले. विजेत्या खेळाडूंना थेट त्यांच्या बँक अकाउंट वर स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (साई) च्या मार्फत अनुक्रमे 6 हजार, 4 हजार व 2 हजार अशी धनराशी देखील दिली जाणार आहे.
दरम्यान, श्रीम. सचिन कुंजीर आणि नूपुर अमित जगताप यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. वरील स्पर्धेसाठी विद्यालयाचे स्काऊट शिक्षक नागेश काळभोर यांचे मार्गदर्शन लाभले. श्रेयशी थोरात हिला संस्थेचे अध्यक्ष सुरेश कांचन, पंडित कांचन, इंद्रभान धुमाळ, संभाजी कांचन व शाळेचे प्राचार्य डॉ. सुमित दास, उपप्राचार्य बाबासाहेब ठुबे व स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे सर्व ट्रस्टींनी कौतुक करीत अभिनंदन केले.