युनुस तांबोळी
Shirur News | शिरूर : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई गाव हे उन्हाळ्यात पाण्याचा भीषण दुष्काळ जाणवणारे गाव आहे. पावसावर आधारित शेती त्यामुळे नागरिकांनी शहराकडे धाव घेतली. येथील परिस्थितीचा अभ्यास करून लोकसहभाग व नाम फाऊंडेशनच्या वतीने पाणीदार गाव करण्याचा ध्यास येथील युवकांनी घेतला आहे. त्यातून सध्या तीन तलावाची निर्मिती झाली असून ४२ तलाव व ओढ्यांचे खोलीकरण करून गाव पाणीदार करत यावर्षी पाऊस झाल्यास शेती ओलीताखाली आणण्याचे काम सुरू आहे. सामाजिक संस्था व नेते मंडळीनी लोकसहभागासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन येथील ग्रामस्थ करू लागले आहेत.
ओढा खोलीकरण व ४२ तलावांची निर्मिती…
नाम फाऊंडेशन जलसंधारणाची कामे करण्यास मदत करते म्हणून कान्हूर मेसाई येथील युवकांनी व ग्रामस्थांनी त्यांच्याशी संपर्क साधला. नाम फाऊंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर, मंकरद अनासपुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात, यशदा जलसंधारण केंद्राचे माजी कार्यकारी संचालक डॅा. सुमंत पांडे, भूगर्भशास्त्रज्ञ श्रीनिवास वडगबाळकर यांच्याकडून पाणीदार गावसाठी कान्हूर मेसाई गावाची निवड करण्यात आली. येथे ग्रामस्थांची बैठक व मार्गदर्शनाचे नियोजन करण्यात आले.
शिवारफेरी करून पावसाचे पाणी आडविण्यासाठी कोणकोणत्या उपाय योजना करता येतील याबाबत आढावा घेण्यात आला. या काळात केंदूर ( ता. शिरूर ) येथील पाणीदार समितीने ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. चित्रफितीव्दारे करण्यात आलेल्या मार्गदर्शनाने येथील युवकांना प्रोत्साहन मिळाले.
गावामध्ये ग्रामसभा घेऊन या योजनेत लोकसहभाग मिळविण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला. युवकांनी घरोघरी जाऊन लोकसहभाग मिळविण्याचे काम केले. त्यातून ६ एप्रिल २०२३ ला नाम फाऊंडेशनच्या वतीने मशीनरी उपलब्ध करून देण्यात आली. त्यातून पुंडे मळई लवण तलावाचे काम सुरू करण्यात आले. जवळपास १९ दिवस या तलावाचे काम हाती घेण्यात आले होते.
यासाठी १ लाख २६ हजार रूपयांचा लोकसहभाग मिळाला होता. ७५ फूट खोली, २५० फूट रूंदी, ३५० फूट लांबीचा तलाव तयार करण्यात आला आहे. २.५ कोटी लिटर एवढी पाणीसाठ्याची क्षमता असणारा हा तलाव तयार झाला आहे. विहिरी पुर्नरभरण होऊन २५० एकर क्षेत्र यामुळे ओलिताखाली येणार आहे. यासाठी ४५ हजार रूपयाचा कागद या तलावाच्या तळाशी टाकण्यात आला आहे.
कागदावर माती टाकण्यासाठी येथील नागरिक श्रमदान करणार असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.जीतेवाडी तलावाचे काम पूर्ण झाले असून १.२५ लाख लिटर पाण्याची साठवण क्षमता असणार आहे. सध्या धुलेवाडी-तळोले खर्डे लवण तलावाचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी येथील युवकांचा सहभाग महत्वाचा समजला जात आहे.
सामाजिक संस्था आणि राजकिय नेत्यांचा असावा सहभाग…
कान्हूर मेसाई हे गाव दुष्काळी गाव म्हणून ओळखले जाते. शासनाने येथे जलसंधारणाची कामे केली मात्र पुरेसे शेती योग्य पाणी येथे उपलब्ध नाही. यामुळे युवकांनी हे गाव पाणीदार बनविण्यासाठी नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने ४२ तलाव व ओढा खोलीकरण करण्याचे ठरविले आहे. यासाठी लोकसहभाग महत्वाचा असून सामाजिक संस्था, राजकीय नेते यांनी सहकार्य देणे आवश्यक आहे. पावसापूर्वी ह्या तलावांची कामे व्हावीत, अशी धडपड येथील युवकांमध्ये पहावयास मिळत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Shirur News : चतुर्थ श्रेणी पदासाठी योग्य सन्मान मिळवून दिला ; प्राचार्य उत्तमराव आवारी यांचे मत