पुणे : तेलंगणातून शहरात विक्रीसाठी पाठविण्यात आलेला गुटखा वाहतूक करणारा ट्रक अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) पकडला. ‘एफडीए’च्या पथकाने या कारवाईत गुटख्याची १४ हजार ३१० पाकिटे तसेच ट्रक असा ४७ लाख २२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ‘एफडीए’च्या अधिकारी शुभांगी जितेंद्र कर्णे (वय ३८) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी राजकुमार शामू यादव (वय ३२, रा. हैद्राबाद, तेलंगणा) याला अटक केली आहे. त्याचे साथीदार कृष्णा यादव (रा. तेलंगणा), शिल्डी कृष्णा रेड्डी (रा. कांदिवली. मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ‘एफडीए’च्या पथकाला पाषाण परिसरातून एक ट्रक मुंबईकडे निघाला असून, ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी पाषाण परिसरातील सेवा रस्त्यावर असलेल्या एका ढाब्याच्या परिसरात ट्रक थांबवला. ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये गुटख्याची पाकिटे आढळून आली.
‘एफडीए’च्या पथकाने गुटख्याची १४ हजार ३१० पाकिटे जप्त केली. ट्रकचालक यादवला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय चौगुले करत आहेत.