पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आधी लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर लग्न करण्यास नकार दिला. यामुळे तरुणीने हाताची नस कापून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२३ ते २२ एप्रिल २०२४ या काळात शेवाळवाडी, मांजरी आणि हडपसर परिसरात घडला आहे.
याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील २३ वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दत्तात्रय कैलास कदम (वय-२५ रा. शिवतेजनगर, काळेपडळ, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आणि आरोपीची ओळख ऑक्टोबर २०२३ मध्ये झाली. आरोपीने तरुणीसोबत ओळख वाढवली. तसेच तिला ‘आय लव्ह यू, मला तू खूप आवडतेस’ असा मेसेज करुन लग्न करण्याचे खोटे आश्वासन दिले. त्यानंतर आरोपीने तरुणीला वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात तिच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्नास नकार दिला. दरम्यान, आरोपीने लग्न करण्यास नकार देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.