पुणे : डेन्मार्कमध्ये राहूनही मराठी मातीतील संस्कार न विसरता, पुण्यातील ३ वर्षाच्या चिमुकलीने खड्या आवाजात शिवरायांचा पोवाडा गायला आहे. तिने गायलेल्या पोवाडा व शिवरायांच्या शौर्य कथांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदवला आहे.
वेदांशी संतोष भोसले असे या तीन वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. वेदांशी ही मूळची पुण्यातील घोरपडे पेठेतील आहे. सध्या ती तिच्या आई-वडिलांबरोबर डेन्मार्क येथील ओडेन्स या शहरात राहते. तिचे वडील संतोष भोसले हे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. तर तिची आई प्रीती भोसले ही गृहिणी आहे.
ओडेन्स येथे झालेल्या भारतीय सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात वेदांशी भोसले हिने ३ मिनिटे आणि ५८ सेकंदात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा स्तुती पोवाडा गायला आहे. सर्वात लहान वयात पोवाडा गाणारी मुलगी म्हणून इंडिया बुकने तिची नोंद घेतली आहे.
दरम्यान, भोसले दाम्पत्याने आपल्या चिमुकलीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजवण्याचे काम करत आहे. वेदांशी ही २ वर्षांची असल्यापासून मराठी कविता, श्लोक, स्तोत्र, आरत्या म्हणते. तसेच त्यांनी मुलीला पोवाडे, शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा शिकवल्या आहेत.
याबाबत बोलताना वेदांशीचे वडिल संतोष भोसले म्हणाले कि, परदेशात वडीलधाऱ्या मंडळींच्या अनुपस्थितीत तिला आपले भारतीय संस्कार कसे देता येतील, याचा सतत प्रयत्न आम्ही करीत असतो. भारत विविधेत एकता असलेला देश आहे. त्यामुळे भारताची संस्कृती जगात सर्वात वेगळी आणि उल्लेखनीय आहे. शिवाजी महाराज अनेकांना फक्त माहिती आहे. मात्र त्यांच्या शौर्य कथा आपण आपल्या मुलांना सांगितल्या पाहिजे. त्यांना लहान वयातच शिवाजी महाराजांची ओळख करुन दिली पाहिजे.
याबाबत बोलताना वेदांशीची प्रीती भोसले म्हणाल्या कि, मी वेदांशीला दररोज मराठी भक्ती गीते, भावगीते, श्लोक, गोष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे आणि कथा ऐकवत असते. वेदांशी तितकेच मन लावून या सगळ्या गोष्टी ऐकायची आणि त्यांचे अनुकरण करायचा प्रयत्न करायची. या गोष्टीचा परिणाम तिचे वय वाढत असताना खूप छान झाला. आणि त्यामुळेच ती सगळे श्लोक, भावगीते व पोवडा आनंदाने म्हणते.