बेंगळुरू: बेंगळुरूमध्ये एका वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलाला चोर बनवले असून अनेक ठिकाणी बापलेकाने चोरी केली आहे. बेट्टाडासनापुरा येथील ५६ वर्षीय महिलेच्या घरातून ४.६ लाख रुपये चोरी केल्याच्या आरोपाखाली ३५ वर्षीय आरोपीला इलेक्ट्रॉनिक्स सिटी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी अशा घरांचा शोध घ्यायचा जिथे महिला एकट्या राहत होत्या. संधी मिळताच तो त्याच्या अल्पवयीन मुलाला घरात घुसून मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी पाठवत असे. ७ मे रोजी, रोजम्मा टेरेस कपडे वाळवण्यासाठी गेली असता, आरोपी आणि त्याच्या मुलाने तिच्या घरातून 20 मिनिटात ४.६ लाख रुपये चोरले. १३ मे रोजी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान, त्याने आपल्या मुलाला अनेक चोरींमध्ये सहभागी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे आणि अल्पवयीन मुलाला बाल न्याय कायद्याअंतर्गत बालसुधारगृहात पाठवले आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी चोराला 3 बायका आहेत. ज्या वेगवेगळ्या शहरात राहतात, तो त्याच्या इच्छेने पाहिजे त्या बायकोकडे जाऊन राहत असे, त्याच्या तीन बायका श्रीरंगपट्टणम, आनेकल आणि चिक्कबल्लापूर या वेगवेगळ्या शहरांमध्ये राहतात. दरम्यान, आरोपी चोराला तीन बायकांकडून 9 मुलं आहेत. या सर्वांचा खर्च नोकरीच्या पैशातून भागणार नव्हता त्यामुळे आरोपीने चोरी करण्यास सुरुवात केली. ही व्यक्ती गेल्या आठ वर्षांपासून घरफोड्या आणि चोरी करत आहे. नऊ मुलांची आणि तीन बायकांची काळजी घेण्यासाठी त्याने घरफोडी करण्यास दरोडे टाकण्यास सुरुवात केली. यामध्ये त्याने त्याच्या अल्पवयीन मुलालाही सहभागी करून घेतले. दरम्यान, इतर प्रकरणांमध्ये आरोपीचा सहभाग आहे का याचा पोलिस तपास करत आहेत.







