Pune News : पुणे : ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधनावेळी त्यांचे वय 66 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे लोककला क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमन तांबे पुणेकर यांनी पुण्यातील आर्यभूषण थिएटरचे संचालक म्हणून काम पाहिले होते. त्यांनी सरस्वतीबाई कोल्हापूरकर यांच्या सहकार्याने तमाशाचा फड चालवला होता. त्यांच्या वगनाट्यांमध्ये पाच तोफांची सलामी, आईचं काळीज आणि दख्खांचा मराठा ही नाटके विशेष गाजली. संताजी घोरपडे या वगनाट्यातील औरंगजेबाची भूमिका त्यांनी प्रभावीपणे साकारली होती.

त्यांनी केवळ लोकनाट्यापुरतेच नव्हे तर चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्येही काम केले होते. उत्कृष्ट गायक आणि सोंगाड्या म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. गेली 50 वर्षे त्यांनी लोककलेच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन केले.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि शाहीर पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान यांसारख्या संस्थांकडून त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या कार्यामुळे लोककला क्षेत्राला मोठे योगदान मिळाले आहे.
दरम्यान, भवानी पेठ येथील कब्रस्तानमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे चिरंजीव राहिल तांबे यांनी अंत्यसंस्कार केले. या वेळी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे तसेच राजकीय आणि लोककला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
अमन तांबे पुणेकर यांच्या निधनामुळे लोकनाट्य क्षेत्राने एक ज्येष्ठ आणि अनुभवी कलाकार गमावला आहे. त्यांच्या कार्याची आठवण कायम राहणार आहे.







