पुणे : मान्सूनच्या आगमनास झालेल्या विलंबाचा फटका आता पुणेकरांना बसू लागला आहे. धरणांतील उपलब्ध पाणीसाठा ऑगस्टपर्यंत पुरवण्यासाठी पुणे महापालिकेने शहरात आज, सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय लागू केला आहे. सम आणि विषम तारखांनुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले असून, पाणीकपातीच्या पहिल्याच दिवशी शहरातील अनेक भागांत पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

पुणे शहराला मुख्यत्वे खडकवासला धरणसाखळीतून पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय पूर्व पुण्यातील काही भागांना भामा-आसखेड धरणातूनही पाणी दिले जाते. मात्र, १५ जून उलटूनही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने जलसाठ्यांवर ताण निर्माण झाला आहे. यंदा ‘एल निनो’चा प्रभाव सक्रिय असल्याने देशात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांनाही पेरण्या पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे.

सध्या पुणे महापालिका दररोज सुमारे १६०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी धरणांतून उचलते. नव्या नियोजनानुसार हा पुरवठा कमी करून ११०० ते १२०० एमएलडीपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सम-विषम तारखांनुसार पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. भामा-आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा होणाऱ्या उत्तर-पूर्व भागाला तांत्रिक कारणांमुळे सध्या या कपातीमधून वगळण्यात आले आहे.
पाणीटंचाईचा गैरफायदा घेऊन कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या अथवा नागरिकांची अडवणूक करणाऱ्या टँकरचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
महापालिकेने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. नळ व पाण्याच्या टाक्यांमधील गळती तातडीने दुरुस्त करणे, पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होणार नाहीत याची काळजी घेणे आणि अनधिकृत नळजोडांची माहिती प्रशासनाला देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. पाणीपुरवठ्याबाबतच्या तक्रारींसाठी १८००-१०३०-२२२ या कॉल सेंटर क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यभरात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेलाही वेग देण्यात आला आहे. महावितरणकडून ग्राहकांना व्हॉट्सअॅपद्वारे अधिकृत संदेश पाठवून मीटर बदलण्याची पूर्वसूचना दिली जात आहे. संदेश मिळाल्यानंतर ४८ तासांच्या आत पारंपरिक वीजमीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसविण्यात येणार असल्याचा दावा महावितरणने केला आहे.







