पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या सीमेवरील नाणेघाट परिसरात घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ‘नानाचा अंगठा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंगरावर मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या दत्ता लोंढे याचा पाय घसरून खोल दरीत पडल्याने हा अपघात झाला. दोन दिवस चाललेल्या खडतर शोधमोहीमेनंतर मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.

दत्ता लोंढे (वय २२, रा. पारगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो तेजस काटे, सुनील पवार आणि अनिकेत ढोबळे या मित्रांसह पावसाळी पर्यटनासाठी नाणेघाट परिसरात गेला होता. चौघेही ‘नानाचा अंगठा’ डोंगरावर चढाई करत असताना अर्ध्या वाटेवर पोहोचले. त्यावेळी दत्ताने आपण परत खाली जात असल्याचे मित्रांना सांगितले आणि तो एकटाच माघारी निघाला.

बराच वेळ उलटूनही दत्ता पार्किंगच्या ठिकाणी परत न आल्याने त्याच्या मित्रांना संशय आला. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने परिसरात त्याचा शोध सुरू केला. मात्र, बराच वेळ शोध घेऊनही त्याचा काहीच मागमूस लागला नाही. अखेर या घटनेची माहिती जुन्नर पोलिसांना देण्यात आली.
शोधमोहीमेदरम्यान दत्ताची एक चप्पल अर्ध्या वाटेवर आढळली. तसेच दरीच्या दिशेने माती घसरल्याच्या खुणाही दिसून आल्या. त्यामुळे त्याचा तोल जाऊन तो खोल दरीत कोसळल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर मुरबाड येथील सह्याद्री गिरी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. अत्यंत अवघड भौगोलिक परिस्थितीत दोन दिवस अथक प्रयत्न केल्यानंतर बचाव पथकाने दत्ताचा मृतदेह दरीतून बाहेर काढला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पावसाळ्यात डोंगरदऱ्यांमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी अधिक सावधगिरी बाळगावी, सुरक्षित मार्गांचा वापर करावा आणि धोकादायक ठिकाणी एकट्याने जाणे टाळावे, असे आवाहन स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाकडून करण्यात आले आहे.







