पुणे : अनंत चतुर्दशीच्या पावन मुहूर्तावर लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी मुंबई आणि पुणेनगरी सज्ज झाली आहे . लाडक्या गणरायाचे विसर्जन सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडावे, यासाठी दोन्ही शहरातील प्रशासन आणि पोलीस दल पूर्णपणे सज्ज झाले आहे.

मुंबईतील प्रसिद्ध गिरगाव चौपाटीवर महापालिका आणि पोलिसांतर्फे विसर्जनासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. चौपाटीवर गर्दीचे नियोजन करण्यासाठी गणेशमूर्तींच्या आकारांनुसार दोन स्वतंत्र रांगा ठेवण्यात आल्या आहेत.4 फुटांपर्यंतच्या गणपतींसाठी डाव्या बाजूला विशेष व्यवस्था केली आहे.सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या गणपतींसाठी उजव्या बाजूला मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

‘पुण्याचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरुजी तालीम गणपतीच्या विसर्जन रथाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून, सकाळी 9 वाजता या मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे .मानाचा चौथा गणपती (तुळशीबाग): तुळशीबाग गणपती बाप्पा पालखीत विराजमान होऊन सकाळी 9 वाजता मुख्य मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाले.

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सकाळपासूनच रस्त्यांवर गणेशभक्तांची प्रचंड गर्दी जमली आहे. पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या सुविधेसाठी आणि सुरक्षेसाठी व्यापक नियोजन केले आहे. मुंबई आणि पुण्यातील या अलोट उत्साहात भाविक अत्यंत भावुक वातावरणात गणरायाला निरोप देत आहेत.
दरम्यान मुबंईतील समुद्रात मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी यंदा पहिल्यांदाच विशेष कृत्रिम ब्रिज उभारण्यात आला आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पीओपीच्या मूर्तींसाठी चौपाटी परिसरात कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.
चौपाटीवर प्रशासनातर्फे स्वागत मंडप, पोलिसांच्या गस्ती बोटी, नियंत्रण कक्ष आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिवसभरात भाविकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे







