पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच मुंबईतील 3 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेशी कनेक्शन असल्याची चर्चा रंगली आहे. याच कारण म्हणजे एअर अॅक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरोने सप्टेंबर 2023 मध्ये मुंबई विमानतळावर झालेल्या चार्टर विमान अपघाताचा अंतिम अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात मोठा खुलासा झाला असून, पायलटच्या अनस्टेबलाइझ्ड अप्रोचमुळे आणि एसओपीचे योग्य पालन न केल्यामुळे हा अपघात झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, ज्या व्हीसीआर कंपनीचे हे विमान होते, त्याच कंपनीच्या विमानाचा बारामतीतही भीषण अपघात झाला होता. 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीला निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान बारामतीच्या धावपट्टीवर उतरत असताना खराब दृश्यमानतेमुळे आणि ढगाळ वातावरणामुळे क्रॅश झाले. या दुर्दैवी अपघातात अजित पवार यांच्यासह विमानात असलेल्या इतर प्रवाशांचाही मृत्यू झाला होता. एकाच कंपनीच्या विमानांसोबत अल्पावधीत घडलेल्या या दोन मोठ्या दुर्घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती आणि विमान प्रवासाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते.

14 सप्टेंबर 2023 रोजी विशाखापट्टनम येथून निघालेले हे नॉन-शेड्यूल पॅसेंजर विमान मुंबईत उतरत असताना जोरदार पावसामुळे दृश्यमानता अचानक खूप कमी झाली होती. लँडिंगच्या वेळी विमान डाव्या बाजूला झुकले आणि पायलटने नियंत्रण गमावल्यामुळे ते धावपट्टीवर कोसळले. या दुर्घटनेत दोन क्रू मेंबर आणि सहा प्रवासी गंभीर जखमी झाले होते.

दरम्यान खराब हवामानातही लँडिंग करण्याचा घेतलेला निर्णय आणि सूचना मिळण्यास झालेला उशीर या अपघाताला कारणीभूत ठरल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.






