दिल्ली : जंतर-मंतर परिसरात प्रशासनाकडून जमावबंदी लागू असतानाही कॉकरोच जनता पार्टीचे नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका आपल्या सहकाऱ्यांसह आंदोलनासाठी गेले होते. याप्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. या कारवाईचा विरोध करण्यासाठी शुक्रवारी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्लीत भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी दिपके यांना ताब्यात घेतले, ज्यामुळे परिसरात काही काळ मोठ्या प्रमाणात तणाव आणि गोंधळ निर्माण झाला होता.

दरम्यान, न्यायालयाने अभिजीत दिपके यांना काही अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला असून त्यांची कारागृहातून सुटका झाली आहे. सुटका झाल्यानंतर दिपके यांनी लगेचच सोशल मीडियावर (X / ट्विटर) एक पोस्ट शेअर केली. सौरभ दास आणि आशुतोष रांका यांचा फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिले, “आता फक्त माझ्या दोन्ही भावांची सुटका होण्याची वाट पाहत आहे.” या ट्विटनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

दिपके यांच्या सुटकेनंतर आता कॉकरोच जनता पार्टीच्या पुढील आंदोलनाची दिशा नेमकी काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्या सहकाऱ्यांच्या अटकेनंतर पक्षाकडून नव्या आंदोलनाची घोषणा केली जाणार का, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. दोन्ही प्रमुख नेत्यांची सुटका होईपर्यंत पक्ष आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत या घटनेवरून मिळत आहेत.







