पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्याप्रकरणातील आरोपी गणेश निवृत्ती मारणे याला विशेष मकोका न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. पुणे शहरात प्रवेश करण्याची परवानगी मिळावी, यासाठी मारणे याने दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्याच्यावरील पुणे प्रवेशबंदी कायम राहणार आहे. परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

शरद मोहोळ हत्याप्रकरणात गणेश मारणे आणि त्याच्या दोन साथीदारांना पुणे-नाशिक महामार्गावरून पळून जात असताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ७ मे २०२६ रोजी मारणे याला जामीन मंजूर झाला होता. मात्र, जामीन देताना त्याला तीन वर्षे किंवा खटल्याचा निकाल लागेपर्यंत पुणे शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती.
पुण्यात आपले कुटुंब आणि व्यवसाय असून, तीन मुलांचे शिक्षण तसेच वृद्ध आईची काळजी घेण्यासाठी शहरात येणे आवश्यक असल्याचे कारण देत गणेश मारणे याने विशेष मकोका न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला.

मारणेच्या अर्जाला विशेष सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत आणि मोहोळ कुटुंबीयांच्या वतीने विरोध करण्यात आला. मोहोळ कुटुंबीयांच्या वतीने ॲड. खेताराम सोलंकी, ॲड. संकेत राव, ॲड. तेजस सावंत आणि ॲड. भानुदास कोळी यांनी बाजू मांडली.

यावेळी शरद मोहोळ हत्येचे सीसीटीव्ही फुटेज न्यायालयासमोर मांडण्यात आले. या फुटेजमध्ये मोहोळसोबत असलेल्या त्याच्या साथीदारांनीच त्याच्यावर गोळीबार केल्याचे दिसत असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. घराबाहेर पडल्यानंतर काही अंतरावरच त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात मोहोळला छाती, डोके आणि मानेवर गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता.
गणेश मारणे याला पुण्यात प्रवेश दिल्यास या प्रकरणातील साक्षीदारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका मोहोळ कुटुंबीयांच्या वकिलांनी मांडली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष मकोका न्यायाधीश एच. एम. भोसले यांनी गणेश मारणे याचा अर्ज फेटाळला. परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे मारणे याच्यावरील पुणे शहरात प्रवेश करण्याची बंदी कायम ठेवण्यात आली आहे.






