पुणे : पुणे आणि कोकण विभागात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या विशेष मोहिमेत मोठी कारवाई समोर आली आहे. निकृष्ट, खराब आणि मुदतबाह्य अन्नपदार्थ पुन्हा बाजारात विक्रीसाठी आणण्याच्या संशयावरून विनापरवाना गोदामांवर धाडी टाकण्यात आल्या. भिवंडी, अंबरनाथ, चाकण आणि निघोजे परिसरातील पुरवठा साखळीची कसून तपासणी करण्यात आली असून, या कारवाईत तब्बल 8392 किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.

तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी गंभीर अनियमितता आढळल्या. अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून गोदामांमध्ये अस्वच्छता, धूळ, जळमटे आणि अपुरी प्रकाशव्यवस्था असल्याचे निदर्शनास आले. तसेच, अनेक आस्थापनांकडे आवश्यक परवाने किंवा वैध कागदपत्रे नव्हती. मालाची खरेदी-विक्री, वाहतूक आणि मुदतबाह्य मालाच्या विल्हेवाटीबाबतच्या नोंदींमध्येही मोठी तफावत आढळली.

याप्रकरणी प्रशासनाने कठोर पावले उचलत 4 प्रमुख आस्थापनांचे परवाने तात्पुरते निलंबित केले आहेत. यात रिलायन्स रिटेल लिमिटेड (चाकण व भिवंडी), रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (वाडपे) आणि झोमॅटो हायपरप्युअर प्रा. लि. (अंबरनाथ) यांचा समावेश आहे. तसेच ब्लिंकिट कॉमर्स प्रा. लि. (निघोजे) सह काही गोदामांना त्यांचे कामकाज तातडीने थांबवण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या एकूण 8392 किलो अन्नपदार्थांचे बाजारमूल्य सुमारे 48 लाख 8 हजार 924 रुपये इतके आहे. याशिवाय परभणी येथेही कारवाई करून 63 लाख 14 हजार रुपयांचे 22550 किलो फरसाण जप्त करण्यात आले आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी एफडीएने ही मोहीम अधिक तीव्र केली आहे. अन्नपदार्थांची साठवणूक आणि वाहतूक करताना सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही खरेदी करताना उत्पादनाची मुदत आणि दर्जा आवर्जून तपासावा. अन्नसुरक्षेशी संबंधित किंवा गैरप्रकारांची कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी एफडीएचा टोल-फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






