नागपूर : वर्धा रेल्वे स्थानक परिसरात एका 19 वर्षीय तरुणीवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी वेगाने कारवाई करत पाचही आरोपींना निष्पन्न करून ताब्यात घेतले आहे.

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील पीडित तरुणी मंगळवारी तिच्या वडिलांच्या मदतीने सोनेगाव (बेला) बसस्थानकावरून चंद्रपूरला काकांकडे जाण्यासाठी निघाली होती. चंद्रपूरहून परतताना बुधवारी रात्री तिने जयंती एक्स्प्रेसने प्रवास केला आणि मध्यरात्री सेवाग्राम रेल्वे स्थानकावर उतरली. तेथून तिने वर्धा रेल्वे स्थानक परिसरासाठी एक ऑटो रिक्षा पकडली.

वर्धा रेल्वे स्थानक भागात पोहोचताच एका संशयिताने तिला गाठून ऑटोमध्ये बसवले आणि आपल्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. त्यानंतर या पाच जणांनी मिळून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.गुरुवारी पहाटे 4:00 वाजता या घटनेची गोपनीय बातमी लोहमार्ग पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबवून गुरुवारी दुपारी 3:00 वाजता तरुणीला शोधून काढले. तिची चौकशी करून तिच्या वडिलांना सुरक्षितपणे बोलावण्यात आले.

तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी परिसरातील 12 ते 13 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पीडित तरुणीने त्यापैकी 5 मुख्य आरोपींची अचूक ओळख पटवली आहे.नागपूर लोहमार्ग पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या ओळखीनंतर पाचही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 70(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्धा लोहमार्ग पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.







