लोणी काळभोर, ता. 6 : एमआयटी कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ रुग्णालयाचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका विद्यार्थ्याचा 24 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून तिघे चोरटे दुचाकीवरून पसार झाल्याची घटना घडली. मंगळवारी (ता. 3 ) रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 304 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आदित्य प्रल्हाद ढगे (वय 20 , रा. राहिजकर वस्ती, लोणी काळभोर, मूळ रा. शिरसवाडी, जि. जालना) हा तरुण एमआयटी कॉलेजमध्ये अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. मंगळवारी रात्री तो मित्राच्या वसतिगृहातून स्वतःच्या खोलीकडे पायी जात असताना एमआयटी कॉलेजच्या गेटजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याला थांबवले. त्यांनी रुग्णालय कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावर आदित्यने समोरच विश्वराज हॉस्पिटल असल्याचे सांगितले.
दरम्यान, दुचाकीवरील मधल्या सीटवर बसलेल्या तरुणाने आदित्यच्या हातातील रेडमी एमआय 11 प्राइम कंपनीचा सिल्व्हर रंगाचा मोबाईल हिसकावला. यावेळी आदित्यने मागे बसलेल्या तरुणाची कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याच्याकडील आणखी एक मोबाईल खाली पडला. मात्र, तिघांनी दुचाकी वेगाने पळवत घटनास्थळावरून धूम ठोकली.

घटनेनंतर आदित्यने एमआयटीच्या सुरक्षा रक्षकांना माहिती दिली. तसेच 112 क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी परिसरात शोध घेतला; मात्र संशयितांचा शोध लागला नाही. याप्रकरणी आदित्य ढगे याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, 24 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेणाऱ्या अज्ञात तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.







