सातारा : दिवाळीची सुट्टी साजरी करण्यासाठी घराकडे निघालेल्या धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींवर प्रवासादरम्यान संकट ओढवले. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात मसूरजवळ त्यांच्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा मध्यरात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 3 चालक आणि 12 पोलीस प्रशिक्षणार्थी असे एकूण 15 जण जखमी झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथून कोल्हापूरच्या दिशेने ही बस जात होती. रात्री साधारण 2.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. ऊस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करत वाहतूक रोखली होती. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी, बस चालकाने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रहिमतपूर-मसूर हा पर्यायी मार्ग निवडला.
मात्र, या ग्रामीण रस्त्यावरून प्रवास करत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि वाहनाचा अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच मसूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकांच्या सहाय्याने सर्वांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

जखमी प्रशिक्षणार्थी हे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांतील रहिवासी असल्याचे समजते. दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी जाण्याचा आनंद असतानाच झालेल्या या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा मसूर पोलीस तपास करत आहेत.







