नाशिक : नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीतील कथित लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांचेही नाव समोर आले आहे. निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. यापूर्वी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावरही याच प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (SIT) सुरू आहे. तपासादरम्यान इम्तियाज जलील यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. तसेच, नगरसेवक मतीन पटेल यांच्या मोबाईलमध्ये काही ऑडिओ रेकॉर्डिंग आढळल्याची माहिती समोर आली आहे. तसेच इम्तियाज जलील विरोधात पुरावे समोर आले असून त्या अनुषंगाने जलील यांचे व्हॉइस सॅम्पलही घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
निदा खानला आश्रय देण्याच्या प्रकरणात जलील यांचा सहभाग असल्याचा मुद्दा तपास यंत्रणेने न्यायालयासमोर मांडल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. मात्र, त्यांच्यावरील आरोपांबाबत अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, या प्रकरणातील निदा खानच्या भूमिकेबाबत न्यायालयाच्या यापूर्वीच्या आदेशातही काही निरीक्षणे नोंदवण्यात आली होती. प्राथमिक चौकशीत पीडितेवर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. एफआयआरमधील आरोपांनुसार, पीडितेचा विश्वास संपादन करून तिला हिंदू धर्माबाबत चुकीची माहिती देण्यात आली आणि धर्म बदलण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या प्रकरणात लैंगिक छळ आणि धर्मांतराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. निदा खानची भूमिका महत्त्वाची असल्याचेही न्यायालयाच्या निरीक्षणातून समोर आले होते. आता इम्तियाज जलील यांचे नाव तपासात आल्याने प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून पुढील तपासात आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







