पुणे: कामगारावर विश्वास ठेवून लाखोंचा ऐवज त्याच्या ताब्यात देणे एका सराफा व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. चांदी शुद्ध करण्यासाठी दुकानात घेऊन जाण्याची जबाबदारी दिलेल्या कामगारानेच मालकाची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यातील रविवार पेठेत उघडकीस आला आहे. तब्बल 16 लाख रुपयांची चांदी, 28 लाख रुपयांची रोकड आणि दुचाकी घेऊन हा कामगार पसार झाला. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार सराफा व्यावसायिक नांदेड सिटी परिसरात राहतात. त्यांचे रविवार पेठेत दागिन्यांचे दुकान आहे. योगेंद्रसिंह गजेंद्रसिंह राठोड (वय 28, मूळ रा. बनासकांठा, गुजरात) हा त्यांच्या दुकानात कामाला होता.
व्यावसायिकाने विश्वासाने त्याच्याकडे 16 लाख रुपयांची चांदी, 28 लाख रुपयांची रोकड आणि दुचाकी सोपवली होती. हा सर्व ऐवज आपल्या मावस भावाच्या दुकानात घेऊन जाऊन चांदी शुद्ध करण्यासाठी देण्यास सांगितले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही कामगार संबंधित दुकानात पोहोचलाच नाही.

सुरुवातीला व्यावसायिकाने त्याची वाट पाहिली. मात्र, त्याच्याशी संपर्क होऊ न शकल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर चौकशी केली असता कामगार चांदी, रोकड आणि दुचाकीसह गायब झाल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने तातडीने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी योगेंद्रसिंह राठोड याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुमारे 45 लाख रुपयांच्या ऐवजाच्या या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पद्माकर पाटील करत आहेत. आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.







