पुणे: पुणे महानगरपालिकेत एका महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यावर आणि माजी उपमहापौरांवर महिला कर्मचाऱ्याचा हात पकडून असभ्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर संबंधित महिलेने महापालिकेच्या विशाखा समितीकडे तक्रार केली आहे. तक्रारीची दखल घेत प्रशासनाने संबंधित माजी उपमहापौरांना महापालिकेच्या परिसरात प्रवेश करण्यास बंदी घातल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पुणे महापालिकेच्या नगरसचिव विभागात कार्यरत आहे. गुरुवारी महापालिकेत स्थायी समितीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत काही कर्मचारी बाहेर गेले होते. त्यावेळी संबंधित महिला कर्मचारीही बाहेर गेली होती.
याच दरम्यान माजी उपमहापौरांनी महिलेचा हात पकडून तिच्याशी असभ्य भाषेत संवाद साधल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे महिला कर्मचारी घाबरली. तिने तेथून स्वतःची सुटका करून घेतली आणि घडलेला प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला.

त्यानंतर महिलेने या प्रकरणाची अधिकृत तक्रार विशाखा समितीकडे दाखल केली. या तक्रारीनंतर महापालिका प्रशासनाने संबंधित माजी उपमहापौरांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, या घटनेमुळे महापालिकेतील कर्मचारी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे. कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.







