पुणे: दिवाळीचा सण जवळ आला असताना पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यंदा दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास पुणे महानगरपालिकेने मनाई केली आहे. वाढते वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याने नागरिकांनी फटाके फोडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महापालिकेने दिलेल्या सूचनेनुसार, सार्वजनिक रस्ते, चौक, गल्ली, पदपथ आणि उद्यानांमध्ये फटाके फोडण्यास परवानगी नाही. याशिवाय रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, न्यायालये आणि शांतता क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या परिसरातही फटाके फोडणे टाळावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दिवाळीच्या काळात फटाके आणि मोठ्या आवाजातील ध्वनिवर्धक यंत्रणांचा वापर वाढतो. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. फटाक्यांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे हवेची गुणवत्ता खालावते. तसेच मोठ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषणात भर पडते. हे परिणाम लक्षात घेऊन नागरिकांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

या निर्णयामागे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांचाही आधार आहे. ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर निर्बंध लागू केले आहेत.

दरम्यान, वातावरणातील बदल आणि वाढते प्रदूषण ही गंभीर समस्या बनत आहे. फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरातील हानिकारक वायूंमुळे श्वसनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे यंदाची दिवाळी शांततेत आणि पर्यावरणाची काळजी घेऊन साजरी करा, असे आवाहन प्रशासनाने पुणेकरांना केले आहे.






