आदित्य बोराटे

इंदापूर: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील राजवडी फाटा येथे सर्व्हिस रोडच्या तटभिंतीच्या बांधकामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळून तरुण बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या बांधकाम कंपनी, ठेकेदार आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष मोरे व दत्तात्रय जगताप यांनी केली आहे. तसेच, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
शुक्रवारी (दि. ३० ऑक्टोबर) सकाळी साडेनऊच्या सुमारास राजवडी फाटा येथे सर्व्हिस रोडच्या तटभिंतीचे बांधकाम सुरू असताना अचानक मातीचा मोठा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत मसरूफुल अजामुद्दीन शेख (वय २०, मूळ रा. मालदा, पश्चिम बंगाल) हा तरुण मजूर मातीखाली पूर्णपणे गाडला गेला. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर नईम अख्तर हा अन्य कामगार जखमी झाला होता. या घटनेची सुरुवातीला इंदापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओ आणि छायाचित्रांमुळे बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कामगारांनी हेल्मेट, सुरक्षा जॅकेट तसेच आवश्यक सुरक्षा साधने परिधान केली नसल्याचे या दृश्यांमधून दिसून येत असल्याचा दावा मोरे व जगताप यांनी केला आहे. बांधकामस्थळी आवश्यक सुरक्षा उपाययोजना, तांत्रिक खबरदारी आणि कामगारांच्या जीविताच्या संरक्षणासाठीच्या नियमांचे पालन झाले होते का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एका तरुण मजुराचा जीव गेला, ही केवळ दुर्घटना म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. बांधकामातील निष्काळजीपणा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांतील संभाव्य त्रुटींची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच, केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद न ठेवता परिस्थितीनुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संतोष मोरे व दत्तात्रय जगताप यांनी केली आहे.






