मुंबई : दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असून आज धनत्रयोदशीचा शुभ दिवस साजरा केला जात आहे. या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सराफा बाजारात ग्राहकांची लगबग वाढली आहे. मात्र, ऐन सणासुदीत सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने खरेदीदारांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत सलग 5 व्या दिवशी तेजी नोंदवण्यात आली आहे. गेल्या 5 दिवसांत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या दरात तब्बल 7,150 रुपयांची वाढ झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 6,560 रुपयांनी महागले आहेत. राजधानी दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या किमतीत आणखी 10 रुपयांची वाढ झाली.
मुंबईतील सोन्याचे दर पाहता, 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 1,46,030 रुपये झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना 1,33,860 रुपये मोजावे लागत आहेत. 18 कॅरेट सोन्याचा दर 1,09,530 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. देशातील इतर प्रमुख शहरांमध्येही सोन्याचे दर साधारण याच पातळीवर आहेत.

दुसरीकडे, चांदीच्या किमतीतही सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. दिल्लीत 1 किलो चांदीचा भाव 100 रुपयांनी वाढून 2,10,100 रुपयांवर पोहोचला आहे. मुंबई आणि कोलकात्यातही चांदी याच दराने विकली जात आहे. मात्र, चेन्नईमध्ये चांदीचा भाव तुलनेने कमी असून, येथे 1 किलोसाठी 2,09,000 रुपये मोजावे लागत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा मौल्यवान धातूंच्या किमतीवर परिणाम होतांना दिसत आहे.







