मुंबई : एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य परिवहन महामंडळाने महिला प्रवाशांना सवलतीचे तिकीट मिळवण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयात तात्पुरती सूट दिली आहे. त्यामुळे आता 7 नोव्हेंबर 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत महिलांना NCMC कार्ड नसतानाही सवलतीचा लाभ घेता येणार आहे. कार्ड नोंदणीसाठी पुरेसा वेळ मिळावा, या उद्देशाने महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

महिला प्रवाशांची संख्या मोठी असल्याने सर्व लाभार्थ्यांपर्यंत NCMC कार्ड पोहोचवण्याचे आव्हान एसटीसमोर आहे. आतापर्यंत सुमारे 1.10 कोटी कार्डांची नोंदणी किंवा वितरण झाले आहे. मात्र, ग्रामीण आणि दुर्गम भागातील अनेक महिलांना या योजनेची पुरेशी माहिती नसल्याने त्यांनी अद्याप कार्डसाठी नोंदणी केलेली नाही. ही बाब लक्षात घेऊन कार्डची अट काही काळासाठी शिथिल करण्यात आली आहे.
दरम्यान, या मुदतीत सर्व महिला लाभार्थ्यांनी NCMC कार्डसाठी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन महामंडळाने केले आहे. त्यासाठी केवळ शहरांमध्येच नव्हे, तर गावपातळीवरही विशेष शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना संबंधित विभाग नियंत्रकांना देण्यात आल्या आहेत.

ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ही मोहीम राबवली जाणार असून स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. महिलांना कार्डची नोंदणी आणि वितरण एकाच ठिकाणी करता यावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्याचे नियोजन आहे.

31 डिसेंबर 2026 पर्यंत राज्यातील सर्व पात्र महिला प्रवाशांची NCMC कार्ड नोंदणी आणि वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे. त्यामुळे सवलतीचा लाभ घेणाऱ्या महिलांनी ही मुदत लक्षात ठेवून वेळेत कार्ड काढून घ्यावे.






