पुणे : पुण्यातील बहुचर्चित वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी लता हगवणे, सुशील हगवणे आणि नीलेश चव्हाण या तिघांनाही सशर्त जामीन मंजूर केला. न्यायमूर्तींनी तिन्ही आरोपींना प्रत्येकी 25,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.

जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने काही कडक अटी लागू केल्या आहेत. आरोपींनी खटल्यातील कोणत्याही साक्षीदारावर दबाव आणू नये आणि पुराव्यांशी छेडछाड करू नये, अशी स्पष्ट ताकीद न्यायालयाने दिली आहे. यासोबतच, पुढील 6 महिन्यांपर्यंत दर महिन्याच्या पहिल्या रविवारी बावधन पोलीस ठाण्यात जाऊन हजेरी लावणे आरोपींसाठी अनिवार्य करण्यात आले आहे.
सुनावणीदरम्यान तक्रारदाराच्या वकिलांनी जामीन आदेशाला 3 आठवड्यांची स्थगिती देण्याची विनंती केली होती, परंतु उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले की, जामीन मिळणे म्हणजे आरोपींची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झालेली नाही. या प्रकरणाचा मुख्य खटला न्यायालयात नियमितपणे सुरूच राहील.

सासरच्या छळाला कंटाळून 16 मे रोजी वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने आत्महत्या केली. या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं होतं. यानंतर हगवणे कुटुंबीयांचे राजकीय लागेबांधे, पोलिसांवर असलेला प्रभाव आणि कौटुंबिक हिंसाचाराची पार्श्वभूमीबद्दल माहिती समोर आल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे यांचा मुलगा सुशील हगवणे तसेच सासू, नणंद व आरोपी निलेश चव्हाणलाही अटक केली होती.

लग्नाच्या वेळी 21 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी आणि सुचविलेल्या कार्यालयात लग्न लावून देण्याचे मान्य करूनही लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून सासू-सासरे आणि नवऱ्याने वैष्णवी चा छळ करण्यास सुरुवात केली होती. चार-पाच महिन्यानंतर सासूने चांदीच्या भांड्यांची मागणी केली. गर्भवती वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करण्याचा आरोप ही माहेरच्या लोकांनी केला होता.आता या प्रकरणातील आरोपीना दिलासा मिळाला आहे






