पुणे : पुण्यात यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिवर्धक यंत्रणांसोबतच ढोल-ताशा पथकांच्या आवाजाचीही ‘डेसिबल’ मोजणी केली जाणार आहे. मिरवणूक मार्गावर तब्बल 120 ठिकाणी आवाजाच्या पातळीवर पोलिसांकडून सतत लक्ष ठेवण्यात येणार असून, ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज असल्यास संबंधितांवर थेट गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला आहे.

धार्मिक सणांमधील वाढत्या आवाजाच्या प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने ही विशेष नियमावली तयार केली आहे.

प्रत्येक गणेश मंडळाला जास्तीत जास्त 4 ‘टॉप’ आणि 4 ‘बेस’ स्पीकर वापरण्याची परवानगी आहे. यापेक्षा जास्त ध्वनिवर्धक आढळल्यास संपूर्ण यंत्रणा जप्त केली जाईल.प्लाझ्मा स्पीकर, मिड-प्रेशर स्पीकर आणि ढोल-ताशा पथकांमधील ‘टोल’ या वाद्याच्या वापरावर पूर्णपणे बंदी असेल. लक्ष्मी रस्त्यावर एका मंडळाला जास्तीत जास्त 2 ढोल-ताशा पथके जोडता येतील. तसेच कोणत्याही चौकात पथकाला केवळ 10 मिनिटेच थांबून वादन करता येईल.

पुणे महापालिकेने विसर्जनासाठी शहरात व्यापक सोय केली आहे. 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत 38 विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत. भाविकांसाठी 58 पक्के हौद आणि 305 ठिकाणी मिळून 812 लोखंडी टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रोत्साहन देण्यासाठी शहरात 224 मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच शाडूच्या मातीचे पुनर्रोपण किंवा संकलन करण्यासाठी 45 विशेष केंद्रे कार्यरत असणार आहेत. नियम पाळून उत्सव शांततेत आणि शिस्तीत साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.







