पुणे: देशभरातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या प्रश्नावर कॉकरोच जनता पक्षाने शुक्रवारी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात देशातील प्रत्येक जिल्ह्यात शांततापूर्ण पद्धतीने निदर्शने आयोजित करण्याचे आवाहन पक्षाने केले आहे. यासंदर्भातील पोस्टर सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, विद्यार्थी संघटना, युवक आणि विविध सामाजिक संस्थांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पक्षाच्या म्हणण्यानुसार, दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांवर देशभरातून एकसंघ भूमिका मांडण्याची गरज असल्याचेही पक्षाने नमूद केले आहे.

कॉकरोच जनता पक्षाने प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी आंदोलन करून विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवण्याचे आवाहन केले आहे. तसेच दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कारवाईला सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांशी ऐक्य व्यक्त करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
आंदोलनासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्थानिक विद्यार्थी संघटना, युवक संघटना आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे आंदोलनाचे नियोजन करावे, आवश्यक त्या प्रशासकीय परवानग्या घ्याव्यात आणि शांततेच्या मार्गाने निदर्शने करावीत, असे नमूद करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या मागण्या उपस्थितांसमोर मांडाव्यात तसेच दिल्लीतील घटनेबाबत निषेध व्यक्त करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या २७ दिवसांपासून विविध राज्यांतील विद्यार्थी आणि तरुण आंदोलन करत असल्याचा दावा पक्षाने केला आहे. या आंदोलनाला देशातील अनेक भागांतून प्रतिसाद मिळत असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. विविध राज्यांतील विद्यार्थी, युवक आणि पालक आंदोलनात सहभागी होत असून, प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकणारे अनेक नागरिकही आंदोलनाला विविध प्रकारे मदत करत असल्याचे पक्षाने सांगितले आहे. दरम्यान, देशभरात होणाऱ्या या आंदोलनाकडे विद्यार्थी, पालक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






