पुणे: पुण्यातील बिबवेवाडी परिसरात पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘याला आज जिवंत सोडायचे नाही’ असे म्हणत टोळक्याने तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

शुभम सोमनाथ कांबळे (वय ३०, रा. बिबवेवाडी) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कृष्णा भारत चौथमहाल (वय २८, रा. शिवतेजनगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रदीप पिंटू कश्यप (वय १९), मयूर रोहिदास चव्हाण (वय २०), शरद पिंटू चव्हाण (वय २१) आणि तेजस सोमनाथ अंबुरे (वय २७, चौघे रा. बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना २१ ऑगस्ट रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास बिबवेवाडी स्मशानभूमीच्या मुख्य गेटसमोरील कट्ट्यावर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम कांबळे आणि आरोपींचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. २१ ऑगस्टच्या रात्री कृष्णा चौथमहाल आणि त्याचा मामेभाऊ शुभम हे बिबवेवाडी स्मशानभूमीजवळ गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून तेथे आले.
पूर्वीच्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी शुभमला शिवीगाळ करत ‘याला आज जिवंत सोडायचे नाही’ असे म्हणत त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यातील एका आरोपीने कोयत्याने शुभमच्या डोक्यात वार केला. या हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.
शुभम गंभीर जखमी झाल्याचे पाहून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर कृष्णा चौथमहाल यांनी इतरांच्या मदतीने शुभमला तातडीने रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी तपास सुरू करून चौघांना अटक केली. आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे करीत आहेत.







