पुणे : पुण्यातील हडपसर येथील ऐतिहासिक ग्लायडिंग सेंटरच्या विकासासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सुमारे २५० एकर परिसरात विस्तारलेल्या या जागेवर अत्याधुनिक हेलिपोर्ट, हवाई साहसी खेळांसाठी सुविधा आणि भव्य एव्हिएशन गॅलरी उभारण्याच्या पर्यायांचा विचार केला जात आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मात्र, प्रकल्पाचे अंतिम स्वरूप डीपीआर पूर्ण झाल्यानंतरच निश्चित होणार आहे.

हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरची जागा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे (एएआय) हस्तांतरित करण्यात आली आहे. या जागेचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी विविध विकास पर्यायांचा अभ्यास केला जात आहे. त्यातून हवाई वाहतूक आणि पर्यटनाशी संबंधित उपक्रमांना चालना देण्याचा विचार आहे.

या जागेवर आधुनिक हेलिपोर्ट उभारण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. यासोबतच ग्लायडिंग, पॅरामोटरिंग आणि अन्य हवाई साहसी खेळांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची शक्यता तपासली जात आहे. विस्तीर्ण आणि सपाट मैदान उपलब्ध असल्याने या उपक्रमांसाठी जागेचा उपयोग होऊ शकतो. विमान वाहतुकीचा इतिहास, तंत्रज्ञान आणि क्षेत्रातील घडामोडींची माहिती देणारी एव्हिएशन गॅलरी उभारण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे.

हडपसर ग्लायडिंग सेंटर हे पुणे विमानतळाच्या फनेल झोनच्या बाहेर असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे येथे होणाऱ्या ग्लायडिंग आणि साहसी हवाई उपक्रमांचा नियमित विमान उड्डाणांवर फारसा परिणाम होणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या ग्लायडिंगसाठी सुमारे तीन हजार फूट उंचीची मर्यादा आहे. हेलिकॉप्टरची वाहतूक सुरू असताना हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून ग्लायडर चालकांना उंची आणि दिशेबाबत सूचना दिल्या जातात.
हेलिपोर्टमध्ये हेलिकॉप्टरच्या उड्डाणासाठी आणि उतरण्यासाठी हेलिपॅड, प्रवासी सुविधा, हँगर, इंधन व्यवस्था आणि हवाई वाहतूक नियंत्रणाशी संबंधित सुविधांचा समावेश असू शकतो. पर्यटन, व्यावसायिक वाहतूक आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठीही अशा सुविधांचा उपयोग होऊ शकतो. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी डीपीआर पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.






