पुणे :पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या मत मोजणीदरम्यान बालेवाडी स्टेडियमवर एका मतपेटीत थेट इशारा देणारी चिठ्ठी सापडल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे . मात्र, मतपेट्या सील नसण्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची होऊन काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या सर्व गोंधळातच मतपेट्यांमधील कागदपत्रे आणि मतपत्रिका बाहेर काढताना एका पेटीत चिठ्ठी आढळली. “आम्हाला कोणीही विकत घेऊ शकत नाही, ۲۰۰۴ पूर्वीची जुनी पेन्शन लागू करा नाहीतर बघा…” असा संतप्त मजकूर या निनावी चिठ्ठीत लिहिला आहे. या अनोख्या माध्यमातून एका मतदार शिक्षकाने थेट उमेदवारांना इशारा दिला आहे.
या निवडणुकीत शिक्षकांच्या विविध मागण्या आणि अडीअडचणींवर नेहमीच भर दिला जातो. 2004 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू नसल्यामुळे यापूर्वी अनेक आंदोलने झाली आहेत. जुन्या आमदारांनी आश्वासने देऊनही प्रश्न सुटले नाहीत, त्यामुळे आता मतपेटीत चिठ्ठी टाकून या मतदाराने आपला संताप व्यक्त केला आहे. सध्या ही निनावी चिठ्ठी आणि त्यातील मजकूर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे







