पुणे : पुण्यात पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीदरम्यान 8 मतपेट्यांचे सील तुटल्याचा आरोप समोर आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर महाविकास आघाडीसह विविध पक्षांच्या उमेदवारांनी आणि प्रतिनिधींनी गंभीर आक्षेप घेतले आहेत.

सकाळी मतमोजणीची सुरुवात सुरळीत झाली होती. अधिकाऱ्यांनी सूचना दिल्यानंतर सर्व प्रतिनिधींसमोर मतपेट्या टेबलवर आणण्यात आल्या. परंतु, काही मतपेट्यांवरील तारेचे आणि लाखेचे सील तुटलेल्या अवस्थेत आढळले. हे पाहून उपस्थितांनी त्वरित आक्षेप नोंदवला.
अधिकाऱ्यांच्या मते कागदी सील सुरक्षित असल्याने मतमोजणी रोखण्याचे कारण नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. तसेच सुरुवातीला लेखी तक्रार स्वीकारण्यास नकार दिल्याचा दावाही प्रतिनिधींनी केला आहे.दरम्यान संपूर्ण मतमोजणी न थांबवता, फक्त सील तुटलेल्या 6 ते 8 मतपेट्या बाजूला ठेवून उर्वरित मोजणी पूर्ण करावी,हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

तसेच या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग झाले असून ते लवकरात लवकर समोर आणावे.ही निवडणूक चिन्हाऐवजी उमेदवारांच्या नावावर लढवली जात असल्याने प्रशासनाने त्वरित चौकशी करून परिस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात आली.

केंद्रावर कोणताही मोठा गोंधळ न करता मतमोजणीचे काम सुरू झाले.मात्र, बाधित मतपेट्यांबाबत निवडणूक प्रशासन आणि निवडणूक आयोग काय अधिकृत निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






