पुणे: पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. विशेषतः राजगड (वेल्हा) तालुक्यात अतिवृष्टीमुळे दोन महत्त्वाचे रस्ते खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, पुढील आदेश येईपर्यंत या मार्गांवर कोणत्याही प्रकारच्या वाहनांना परवानगी देण्यात येणार नाही.

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिलेल्या आदेशानुसार, राजगड (वेल्हा)-केळद रोड (मढेघाट) तसेच माळवडी-जोगवडी-भुतुंडे-बालवड-शेनवड हे दोन्ही मार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. सततच्या पावसामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली असून, आणखी दुर्घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाने हा प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे.

मढेघाट मार्गावर रस्त्याचा काही भाग खचल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे केळद परिसरातील नागरिकांनी केळद – निगडे खुर्द – कुंबळे – चांदवणे – भुतोंडे – पाल बुद्रुक – वाजेघर – खरोव मार्गे राजगड (वेल्हा) आणि पुढे पुण्याकडे प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, माळवडी-जोगवडी-भुतुंडे-बालवड-शेनवड मार्गावरही अतिवृष्टीमुळे रस्ता खचल्याने वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे. गोहिणी येथून जाणाऱ्या वाहनांनी गोहिणी – भुतुंडे – पाल बुद्रुक – वाजेघर – खरीव मार्गे वेल्हे आणि पुढे पुण्याकडे जावे. तसेच बलवड परिसरातील नागरिकांसाठी शेनवड – पासली – जाधववाडी – भट्टी मार्गे राजगड (वेल्हा) आणि पुण्याकडे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रशासनाने नागरिकांना विनाकारण बंद मार्गांवर प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये, तसेच पावसाळ्यात डोंगराळ आणि घाट परिसरात अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहन केले आहे. हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






