नांदेड: नांदेडमध्ये घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आंचल मामिडवार हिने प्रियकर सक्षम ताटे याच्या निधनानंतर थेट त्याच्या मृतदेहाशी लग्न करून आयुष्यभर त्याची विधवा म्हणून राहण्याची शपथ घेतली होती. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती. मात्र, अवघ्या ३.५ महिन्यांतच तिने सक्षमच्या घरून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

घर सोडल्यानंतर आंचलने सक्षमच्या लहान भावावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. त्याने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा तसेच वारंवार अयोग्य स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा तिने केला आहे. या कारणामुळेच आपण ते घर सोडले, असे तिने प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर, आंचलने आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत सक्षमच्या २ ते ३ मित्रांकडून आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

या प्रकरणाला आता वेगळे वळणे मिळत आहेत. सक्षमच्या आईने आंचलचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. तिने स्वतःच्या मर्जीने घर सोडले असून तिच्या मनातील हेतू आम्हाला माहित नाही, असे सक्षमच्या आईने म्हटले आहे. आंचलचे आई-वडील हत्येच्या गुन्ह्याखाली सध्या तुरुंगात आहेत आणि ती स्वतः सध्या आजीसोबत राहत आहे. आंचलने पोलीस तक्रार केल्यानंतर हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. आता या प्रकरणाची नेमकी सत्यता काय आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.







