राहुलकुमार अवचट
Pune News : यवत : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील बुधराणी हॉस्पिटलच्यावतीने मोतीबिंदू मुक्त अभियानाअंतर्गत सहकार्य करणाऱ्या पाटस येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे डॉ. पांडुरंग लाड व श्री काळभैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जनार्दन चांदगुडे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.
नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, पाटस व के. के. आय इन्स्टिटय़ूट साधु वासवानी मिशन संचलित बुधराणी हॉस्पिटल कोरेगांव पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने जून २०१६ पासून मोतीबिंदू मुक्त अभियान व अंधत्वाकडून दृष्टीकडे अंतर्गत मोफत मोतीबिंदु निदान शिबीर ही अखंड सेवा पाटस, यवत यांसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये कार्यान्वित केली आहे.
आनंद त्यांच्यासाठी असतो, जे दुसऱ्यांसाठी जगतात, या वाक्याप्रमाणे दृष्टीहीनांसाठी राबविलेल्या उपक्रमासाठी दिलेल्या प्रशंसनीय समर्थनाबद्दल बुधरानी हॉस्पिटलच्या वतीने डॉ. लाड व चांदगुडे यांना गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी करत असलेल्या सहकार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन बुधराणी हॉस्पिटल नेत्र विभागाचे व्यवस्थापक रोहित वाघ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या अनेक वर्षांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
या वेळी डॉ. पांडुरंग लाड यांनी मनोगत व्यक्त केले. लाड म्हणाले की, बुधराणी हॉस्पिटल व पाटस ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून दृष्टीहिनांची सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. के. के. आय इन्स्टिटय़ूट साधु वासवानी मिशन संचलित बुधराणी हॉस्पिटलच्या वतीने व सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. याबद्दल बुधराणी हॉस्पिटल प्रशासनाचे व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करत, यापुढे देखील श्री काळभैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गोरगरीब जनतेसाठी विविध उपक्रम अधिक जोमाने राबवले जातील, असे जनार्दन चांदगुडे यांनी सांगितले.