Pune News : पुणे : ड्रग माफीया ललित पाटील ससून रूग्णालयातून फरार झाल्यानंतर ससून रूग्णालय चर्चेत आले आहे. ससून रुग्णालय औषधे खरेदी करण्यासाठी मिळालेले अनुदान हाफकिन या संस्थेला देते. गेल्या वित्तीय वर्षामध्ये मिळालेल्या अनुदानातून सहा कोटी २७ हजार रुपये हाफकिन संस्थेला देण्यात आले. मात्र, संस्थेकडून कोणत्याही प्रकारची औषधे ससूनला मिळालेली नाहीत, अशी माहिती ससून रुग्णालय प्रशासनाने विभागीय आयुक्तालयाला पाठविलेल्या अहवालात उघड झाली आहे.
अहवालात अनेक बाबी उघड
ससून रुग्णालय प्रशासनाने विभागीय आयुक्तालयाला पाठविलेल्या अहवालात अनेक बाबी उघड झाल्या आहेत. ससूनमध्ये परिचारिकांची १०४ पदे आणि वर्ग चार संवर्गाची ३८१ पदे, तर बी. जी. वैद्यकीय महाविद्यालयात वर्ग चार संवर्गाची ९७ पदे रिक्त आहेत. (Pune News) याशिवाय ससूनमध्ये १२९६ खाटा मंजूर असताना १८०० पर्यंत खाटा वाढविण्यात आल्या असून, वाढीव खाटांसाठी आवश्यक मनुष्यबळाचा प्रस्ताव यापूर्वीच शासनाला पाठविण्यात आला आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ससून सर्वोपचार रुग्णालयाला शुक्रवारी भेट देऊन तेथील आरोग्य सेवा, मनुष्यबळ, औषधपुरवठा आदी बाबींची पाहणी केली. याबाबत ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी एक अहवाल तयार करून विभागीय आयुक्त राव यांच्याकडे शनिवारी पाठविला. राव यांनी हा अहवाल तातडीने राज्य शासनाला सुपूर्त केला. ससूनमध्ये सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी शासनाकडून १२ कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. (Pune News) त्यांपैकी आठ कोटी ५७ लाख ५० हजार रुपये मिळाले. या निधीपैकी सहा कोटी २७ हजार रुपये ससूनकडून हाफकिन संस्थेला देण्यात आले, तर उर्वरित दोन कोटी ५७ लाख २३ हजार रुपयांची संस्था स्तरावर औषधे खरेदी करण्यात आली. मात्र, सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात हाफकिन संस्थेला ससूनकडून औषधे खरेदीसाठी देण्यात आलेल्या रकमेपैकी कोणतीही औषधे प्राप्त झालेली नाहीत.
चालू आर्थिक वर्षासाठी १२ कोटी २५ लाख रुपये ससूनला मंजूर झाले. त्यांपैकी तीन कोटी ६७ लाख ५० हजार रुपये प्राप्त झाले. त्यांपैकी ४९ लाख ५५ हजार रुपयांची औषधे खरेदी ससून स्तरावर करण्यात आली. (Pune News) ससूनमध्ये परिचारिकांची ११०१ पदे मंजूर असून त्यांपैकी ९९७ पदे भरली आहेत, तर १०४ पदे रिक्त आहेत, असे अहवालात म्हटले आहे.
ससूनमध्ये उपचारांची निकड पाहता, १८०० खाटांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मंजूर पदे १२९६ खाटांसाठी असून, वाढीव खाटांसाठी आवश्यक मनुष्यबळाचा प्रस्ताव यापूर्वीच शासनाकडे सादर करण्यात आला आहे, असेही अहवालात नमूद केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : फेरफटका मारण्यासाठी जायचा अन् तारांकित हॉटेलमध्ये रहायचा… ललित पाटीलचे कारनामे उघड
Pune News : सणसवाडीत पायी चालणाऱ्या नागरिकांची लूट; काही तासांत दरोडेखोरांना केले जेरबंद