Shirur News : पुणे : इनामगाव येथील घोडनदीच्या तीरावर उत्खनन करताना इसवी सन पूर्व ३५०० काळातील जोर्वेकालीन संस्कृतीचे अवशेष आढळले होते. या अवशेषांचे जतन करण्यासाठी या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ‘एकछत्र योजनेंतर्गत’ ६ कोटी ३९ लाख इतका निधी मंजूर केला आहे. यामुळे खासदार डॉ. अमोल कोल्हे व इनामगाव ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आले असून, त्यांनी समाधानाची भावना व्यक्त केली.
प्राचीन संस्कृतीचा वारसा पाहण्यासाठी देश-विदेशातून येतात अभ्यासक
सन १९६८ ते १९८२ या काळात डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या उत्खननात हडप्पा, सिंधू, राखीगडी, नेवासा, दायमाबाद येथे सापडलेल्या अवशेषांशी साम्य असणाऱ्या प्राचीन जोर्वेकालीन संस्कृतीचे अवशेष सापडले. (Shirur News) ऐतिहासिक व प्राचीन संस्कृतीचा वारसा असलेल्या घोडनदीच्या तीरावरील या उत्खनन स्थळाचा विकास व जतन व्हावे यासाठी इनामगाव ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थ गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत होते. जवळपास ६५ एकरांवरील हे उत्खननस्थळ पाहण्यासाठी देश-विदेशातून अभ्यासक व पर्यटक येतात. त्यामुळे प्राचीन सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या या उत्खनन स्थळांचे जतन व्हावे यासाठी प्रयत्न करण्याची मागणी इनामगाव ग्रामपंचायतीने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे केली होती.
दरम्यान, डॉ. कोल्हे यांनी या मागणीची तातडीने दखल घेतली. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी पत्रव्यवहार केला. राज्य पुरातत्त्व विभागाचे उपसंचालक डॉ. विलास वाहाणे यांच्याशी चर्चा केली.(Shirur News) सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, या उत्खनन स्थळाला संरक्षक भिंत बांधण्यासाठी राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ‘एकछत्र योजनेंतर्गत’ ६ कोटी ३९ लाख इतका निधी मंजूर केला आहे.
इनामगावच्या ग्रामस्थांची मागणी व अपेक्षा पूर्ण करण्यात मला यश मिळाले याचा मला आनंद आहे.(Shirur News) भविष्यात याठिकाणी येणाऱ्या अभ्यासक व पर्यटकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
शिरुर लोकसभा मतदारसंघात अनेक पुरातन धार्मिक, ऐतिहासिक व वारसास्थळे आहेत. विशेषतः बोरी बुद्रुक येथील प्रागैतिहासिक पुरातत्वीय संशोधन स्थळे, प्राचीन कुकडेश्वर मंदिरावर कळस बसविणे आणि इनामगाव येथील घोडनदीच्या तीरावरील उत्खनन स्थळाचा विकास व जतन या कामांचा पाठपुरावा मी सातत्याने करत होतो. त्यापैकी इनामगावच्या उत्खनन स्थळाला संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी मंजूर झाला असून, कुकडेश्वरचा प्रस्ताव प्रगतीपथावर आहे. बोरी बुद्रुक येथील प्रागैतिहासिक पुरातत्वीय स्थळाचा विकास व जतन करण्यासाठी निधी मागणीचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. माझा पाठपुरावा सुरू असून लवकरच कुकडेश्वर व बोरी बुद्रुक ही दोन्ही कामे मार्गी लागतील.
डॉ. अमोल कोल्हे, खासदार
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : …अशा सरकारला जनतेने अद्दल घडवावी – खासदार सुप्रिया सुळे यांचे टीकास्त्र