बापू मुळीक
पुरंदर : पुरंदर विधानसभा मतदारसंघांमध्ये दि. ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना घरबसल्या गृहभेट मतदान करता येणार आहे. वय 85 वर्ष व त्याहून अधिक असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच 40% पेक्षा अधिक दिव्यांगत्व असणाऱ्या मतदारांना या सवलतीचा फायदा घेता येणार आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये 85 वर्षं वरील 74 मतदारांनी तर 16 दिव्यांग मतदारांनी गृह भेट मतदान करावयाची मागणी केलेली आहे. तसेच काही ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी ते मतदान केंद्रावर समक्ष येऊन मतदान करण्यास सक्षम असल्याचे घोषणापत्र लिहून दिले आहे.
कालपासून गृहभेट मतदान सुरू झाले असून 50 टक्क्यांहून अधिक मतदान पूर्ण झाले आहे. यासाठी चार पथके तैनात करण्यात आली असून प्रत्येक पथकात एक मतदान अधिकारी, सहाय्यक मतदान आधिकारी, सूक्ष्म निरीक्षक, व्हिडिओग्राफर शिपाई व पोलीस कर्मचारी असे एकूण सहा कर्मचाऱ्यांचा समावेश असतो व मतदानाची पूर्णपणे गोपनीयता राखली जाते.
विठ्ठल दौलत ढोणे राहणार गराडे ता. पुरंदर या 103 वर्ष वय असणाऱ्या आजोबांनी आज गृहभेट मतदान केले, सदर प्रसंगी गृहभेट मतदान कर्मचाऱ्यांसोबत मुख्य निवडणूक निरीक्षक नसीम खान हे ही उपस्थितीत होते. ढोणे यांनी घरबसल्या मतदान करता आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली.