Pune News : धनकवडी, ता.१४ : भारती विद्यापीठासमोरील नॅन्सी लेक होम या गगनचुंबी इमारतीच्या आग लागल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.१३) रात्रीच्या सुमारास घडली होती. या भीषण आगीत एका बंद खोलीत अडकलेल्या ६ वर्षाच्या चिमुकलीला अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचविले आहे.
जवानांच्या प्रयत्नांना यश
राजलक्ष्मी दिलिप सुकरे असे सुखरूप वाचविण्यात आलेल्या चिमुकलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नॅन्सी लेक होम या इमारतीत आग लागल्याची माहिती अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळाली होती. क्षणाचा ही विलंब न करता कात्रज अग्निशमन दलाबरोबरच गंगाधाम, कोंढवा बुद्रुक येथून एकूण ४ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. तेथे ११ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर १५६० स्क्वे.फुट सदनिकेत मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे दिसून आले.
जवानांनी तडकाफडकी चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला आणि त्याचवेळी घरामधे कोणी अडकले आहे का, याची तपासणी करत असताना ६ वर्षांची बालिका राजलक्ष्मी खिडकी मधील लोखंडी ग्रिलमधे अडकल्याचे आणि आपल्याला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत असल्याचे दिसून आले.
त्यानंतर अग्निशमनच्या जवानांनी तातडीने मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दोन बी.ए. सेट तसेच हायड्रॉलिक कटर, कटावणी, रस्सीचा वापर करत उंच खिडकीजवळ शिडी लावून मुलीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याचवेळी काही जवानांनी शेजारील सदनिकेच्या गच्चीवरुन मुली च्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. अवघ्या पाच ते दहा मिनिटात जवानांच्या प्रयत्नांना यश आले आणि आगीमधे अडकलेल्या मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली.
अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदिप खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तांडेल सचिन शिंदे, वाहन चालक येरफुले, अतुल मोहीते, तांडेल मंगेश मिळवणे, जवान रामदास शिंदे, तेजस मांडवकर, चंद्रकांत गावडे, सुधीर नवले, लक्ष्मण घवाळी, दिगंबर बांदिवडेकर, तेजस खरीवले, अर्जुन यादव आणि अभिजित थळकर यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.