पुणे : लोणी काळभोर पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांवर चांगलाच बडगा उगारला आहे. त्यामुळे अवैध धंदेवायकांचे कंबरडेच मोडले गेले आहे. यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई करण्याकडे मोर्चा वळवला आहे. यापुढे कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट्स जप्त करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
बुलेटमध्ये बदल करून महामार्गावर तसेच रस्त्यावर कर्णकर्कश आवाज करीत धावत असतात. अशा वाहन चालकांवर प्रादेशिक परिवहन खात्याकडून कार्यवाही होणे अपेक्षित असताना याकडे लक्ष देण्यासाठी परिवहन खात्याकडे वेळच नाही की काय? अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. पुणे सोलापूर महामार्गांवर परिवहन खात्याची गस्त सुरूच असते.
तसेच पुणे शहर वाहतूक शाखेकडूनही चौकांमध्ये वाहनावर नियंत्रण ठेवण्याचे काम सुरु असते. तेव्हा त्यांच्या देखील निदर्शनास ही गोष्ट येऊ नये? याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या कर्णकर्कश आवाजामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून यावर ठोस कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
लोणी काळभोरचे पोलीस निरक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गेल्या काही दिवसापासून अवैध धंद्यावर कारवाईची धडक मोहीम राबविली आहे. त्यामुळे सर्वसमान्य नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मूळ गाडीमध्ये व सायलेंसरमध्ये बदल करून रस्त्यावर कर्णकर्कश आवाज करत बुलेट गाडी पळवली जाते. यावर परिणामकारक कारवाई आवश्यक आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत.