लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नवपरिवर्तन पॅनेलने प्रचारात पहिल्या दिवसापासून आघाडी घेतली आहे. प्रचारादरम्यान मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता या निवडणुकीत नवपरिवर्तन पॅनेल सतराच्या सतरा जागी विजयी होणार आहे, असा विश्वास नवपरिवर्तन पॅनेलचे प्रमुख व सरपंच पदाचे उमेदवार चित्तरंजन गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडे वस्ती या परिसरात कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्तरंजन गायकवाड यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
“कुठल्याही गावाच्या विकासात ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची असते. ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेल्या सदस्यांमध्ये जर विकासाचा दृष्टीकोन असेल तर गावाचा विकास वेगाने होतो. परिवर्तन पॅनेलमध्ये तरुण, अनुभवी, अभ्यासू व विकासाचा दृष्टीकोन असलेल्या उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. परिवर्तन पॅनेलमधील उमेदवारांना गावातील समस्यांची जाणीव आहे. त्यामुळे हे उमेदवार गावाच्या विकासासाठी झोकून देऊन काम करणार आहेत”
वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या माध्यमातून मोठा निधी आणून गावात विकास कामे केलेली आहेत. हे मतदारांनी पाहिले आहे. आगामी काळात मतदारांना विकास हवा आहे. त्यामुळे परिवर्तन पॅनेलच्या मागे मतदारांनी आपली मोठी ताकद उभी केली आहे. त्यामुळे परिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून येतील, असा दावाही या वेळी बोलताना गायकवाड यांनी केला आहे.
रविवारी (ता. १८ डिसेंबर) रोजी मतदान होत असून गुरुवारी (ता. १५ डिसेंबर) रोजी प्रचाराची रणधुमाळी संपणार असल्याने पँनलप्रमुख आपल्या उमेदवारांसह जास्तीत – जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्नांची शर्त करताना दिसत आहेत. माहितीपत्रके, स्टिकर्स या पारंपारीक प्रचारासमवेत मराठी चित्रपटांच्या गाजलेल्या गाण्यांच्या चालींवर रचलेली प्रचाराची गाणी यांचबरोबर एलईडी स्क्रिन लावून केलेली व करणार असलेली कामे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.
व्हॉटस अप, फेसबुक मोबाईल एसएमएस, ध्वनीमुद्रित कॉल रेकॉर्डिंग, प्रचार फेरी, पदयात्रा, बॅनर, फ्लेक्स, पॅम्पलेट, जाहीरनामा, एअर बलून, घोंगडी बैठका, कोपरा सभा, मतदारांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेणे, नाते संबंध, भावकी, मळा आदी घटकांचा वापर नवपरिवर्तन पॅनेल करत आहे. तसेच इतर सोशल मिडीयाचा पुरेपूर वापर करून प्रचारांत आघाडी घेण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत.
दरम्यान, वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून जिल्ह्यात एक आदर्श गाव म्हणून पुढे आणण्याचे सर्व नियोजन नवपरिवर्तन पॅनेलने केले आहे. ही बाब मतदारांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे परिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी होतील व आम्ही 17-0 असा दणदणीत विजय मिळवू, असा विश्वास सरपंच गौरी गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.