हनुमंत चिकणे
लोणी काळभोर, (पुणे) : मुंबई – बंगळुरू महामार्गावर रावेत भागात पुष्पा सिनेमा स्टाईलने सुरू असलेली विदेशी दारू वाहतूक उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. ट्रकच्या पाठीमागे जनावरांचे खाद्य असलेल्या गोण्या टाकून पुढील बाजूला गोवा राज्यात विक्री करण्यासाठी परवानगी असलेल्या ७५ लाखांच्या ४३ हजार विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
विजय चंद्रकांत चव्हाण (५३, रा. सातारा), सचिन निवास धोत्रे (३१, रा. सांगली) या दोघांना अटक करण्यात आली आहे. सदर ट्रकमधून ते रॉयल ब्लू व्हिस्की, मॅजिक ऑरेंज, रॉयल ब्लॅक, व्होडका या विदेशी मद्याची वाहतूक करत होते, अशी माहिती उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधिक्षक चरणसिंग रजपूत यांनी दिली आहे.
माहिती उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधिक्षक चरणसिंग रजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई – बंगळुरू महामार्गावर पथक गस्त घालत होते. त्यांना अवैध मद्याची वहातूक करत असलेला एक ट्रक जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने रावेत परिसरात सापळा रचला व संशयास्पद ट्रक अडवला. ट्रकची तपासणी केली असता पाठीमागे खतांच्या गोण्या आढळून आल्या.
पथकाने ट्रकची झडती घेतली असता आतमध्ये ऑरेंज मॅजिक, रॉयल ब्लू व्हिस्कीचे ४३१ बॉक्स, अॅपल व्होडकाचे ७८५ बॉक्स, किंगफिशरचे ४० बॉक्स मिळून जवळपास ४३ हजार बाटल्या आढळून आल्या. आरोपींकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक तपासणी केली असता ट्रकमधून मुंबईकडे ही दारू घेऊन निघाले होती, असे प्राथमिक तपासात समोर आले असून पुढील तपास उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी पथकाने दोघांना ताब्यात घेत अटक केली आहे.
सदरची कामगिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर, पुणे अधिक्षक चरणसिंग रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक युवराज शिंदे, एस. आर. पाटील, निरीक्षक दिपक सुपे, प्रविण शेलार, दुय्यम निरीक्षक राम सुपेकर, अशिष जाधव, सागर धुर्वे, डी. के. पाटील, अतुल बारगळे, तात्या शिंदे, अशोक अदमनकर, अंकुश कांबळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे.