पुणे : सगळीकडे वातावरणात बदल होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाचे प्रमाण वाढले आहे. या उन्हाच्या तडाक्यामुळे हैरान झालेल्यांना अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा पसरलेला आहे. पुण्यातील काही भागात सरी कोसळल्या पण अचानक झालेल्या पावसामुळे बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
पुण्यामध्ये आज रविवारी आकाश ढगाळ राहून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे; मात्र रात्री उकाडा जाणवू शकतो. सोमवारी आणि मंगळवारी आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी आकाश अंशत: ढगाळ राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
पुढील दोन दिवस पुण्यातील लोहगाव, चिंचवड, लवळे, मगरपट्टा, एनडीए, कोरेगाव पार्क येथील तापमानाचा पारा ४० ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावरच दुचाकी उभ्या करून झाडे, दुकानांचे शेड, बसस्टॉप, चौकामधील कोप-यातील जागा यांचा आधार घेतला. तर पावसापासून बचावासाठी पुलाखालीही दुचाकीस्वारांनी आसरा घेतलेला आहे. शहराच्या अनेक मुख्य चौकांमध्ये वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला आहे.